बुधवार, १० जून, २०२०

लोकशिक्षक साने गुरुजी


लोकशिक्षक साने गुरुजी

तथागत गौतम बुद्धांना जगाचे शिक्षक म्हटले जाते. कारण आज पासून अडीच हजार वर्षांपूर्वी मानव कळपांमधून वसाहतीत समाज म्हणून विकसित होण्याच्या काळात गौतम बुद्धांनी समाज उभारणी साठी व्यवस्था नावाचे अस्त्र देऊन लोक कल्याणासाठी मानवी समूहाला काही वैचारिक मूल्य दिली. आणि यातूनच जगातील पहिला मानव केंद्री धर्म विचार म्हणून विवेकशील बौद्ध धम्म उदयाला आला सत्य अहिंसा करुणा शील या त्या काळात संपूर्ण पणे नवीन असलेल्या संकल्पनांसह जगभर फोफावला. खऱ्या लोकशिक्षकाचे हेच कार्य असते विकासभिमुख समाज समूहाला जुन्या अडगळीतल्या कप्पे बंद पठडीतून बाहेर काढून तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या स्वत्वाची जाणीव करून देण्यासाठी नवीन मानवी मूल्यावर आधारलेल्या प्रशस्त अशा मूल्य व्यवस्थेवर उभा असलेला, वैचारिक व विवेकाच्या पाय वाटेवरून वाटचाल करणारा मानव समाज निर्माण करणे हेच लोकशिक्षकाचे अंतिम उधिष्ठ असते.

पांडुरंग सदाशिव साने या हाडाच्या शिक्षक असलेल्या, उणीपुरी एकावन्न वर्ष जगलेल्या साध्या माणसाला गुरुजी हे अध्य बिरुद चिटकले आणि महाराष्ट्राच्या खेड्या पाड्यात वाडी वस्तीवर आज तागायत लोकाभिमुख असलेले एकमेव गुरुजी म्हणजे “ साने गुरुजी ” ! हे नामानिधाण रूढ झाले. हेच खऱ्या लोक शिक्षकाचे वैशिष्ट्य व वेगळेपण असते. साने गुरुजींनी आपल्या आयुष्याचा फार कमी काळ शिक्षक म्हणून व्यतीत केला अमळनेर च्या प्रताप हायस्कूल मधे विद्यार्थी वसतिगृहात राहून विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये स्वभान, माणूसभान व समाजभान जागविण्याचे मोठे काम साने गुरुजी नावाच्या या लोकशिक्षकाने केले.

संत ज्ञानेश्वरांना अवघा महाराष्ट्र “ माऊली ” म्हणून साद घालतो. जगामध्ये एखाद्या नर श्रेष्ठाला माउली म्हणजे आई ! आई ची उपाधी सगळ्या समाजाकडून प्राप्त होणे हि उल्लेखनीय गोष्ट आहे हीच गोष्ट साने गुरुजींच्या बाबतीत घडली आहे. मातृ प्रेमाचे महामंगल स्त्रोत्र म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ज्या पुस्तकाची पारायणे करून महाराष्ट्राच्या किती पिढ्या मातृ प्रेमाचा पान्हा पिऊन तृप्त झाल्या याची गणती करता येणार नाही. श्याम ची आई हे साने गुरुजींचे पुस्तक आज हि तितकेच लोकप्रिय आहे. व संस्कार या शब्दाचे प्रतिरूप बनले आहे. संस्कारक्षम वयात मनाची मशागत करणारे श्याम ची आई हे पुस्तक लिहून साने गुरुजी म,महाराष्ट्राची माय माऊली झाले आहेत. जगामध्ये शिक्षकाचा एवढा मोठा सन्मान क्वचितच झाला असेल.

अमळनेर च्या प्रताप हायस्कूल मधील वसतिगृहाच्या खोलीत मुलांबरोबर राहतांना साने गुरुजी यांच्या मधील समाज शील शिक्षक सदैव जागा असल्याने घरापासून दूर असलेल्या वस्तीगृहामधील मुलांना आई वडिलांची माया देता देता विद्यार्थ्यांना सामाजिक भान देण्यासाठी विविध उपक्रम कार्यक्रम सुद्धा सतत देत असत ऐन भरात असलेले स्वातंत्र्याचे आंदोलन त्याकाळी जोरात असल्याने वातावरणामध्ये सुद्धा एकप्रकारचा जोश भरलेला होता अशा महत्वाच्या निर्णायक क्षणी साने गुरुजीं सारखी संवेदन शील व्यक्ती शांत राहणे शक्य नव्हते साने गुरुजी मुलांना बरोबर घेऊन विद्यार्थी नावाचे हस्तलिखित दररोज प्रकाशित करीत. देश समाज व भारताचा स्वातंत्र्य लढा या विषयी मुलांना कल्पना यावी व आपल्या बाल सुलभ भावनां व्यक्त करता याव्यात इतका जरी माफक हेतू असला. तरी जाती भेद गरिबी, विषमता, स्त्री पुरुष संबंध या गोष्टीची मुलांना जाणीव व्हावी व भवतालाचे चटके त्यांना लागू नये यासाठी गुरुजी सतत दक्ष असत.

साने गुरुजी काही काळाच शिक्षक म्हणून सेवेत असले तरीही गुरुजींची पहिली ओळख हि शिक्षक म्हणूनच आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला साने गुरुजींनी सेवा व कृतीचा भक्कम वारसा व प्रेरणा दिली आहे. साने गुरुजी हयात असल्याचा पन्नास वर्षांचा काळ हा महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक शिक्षणाचा विचारांचा नवोन्मेषी व नाविन्य पूर्ण कल्पनांचा होता. बालकांचा मनोविकास व भावविश्वातील कल्पनांचा विस्तार या संबंधी गुरुजींची कृतीशीलता हि शैक्षणिक क्षेत्रातील तगड्या कार्यकर्त्याची होती. आईची मुलांच्या वाढीबाबतची उत्कट भावना व शिक्षकांची मुलांची भाव विश्वाची व्याप्ती वाढविण्याची कळ कळ या दोन्ही गोष्टी एक व्हाव्यात तशाच घर व शाळा या दोन्ही गोष्टी एकरूप व्हाव्या हि बाल शिक्षणाच्या संबंधात साने गुरुजींची धारणा होती.

साने गुरुजींनी सहा वर्षाच्या आपल्या शिक्षकी पेशाच्या काळात अमळनेर शहराच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रावर आपला अमीट ठसा सोडलाच या पेक्षाही प्रताप हायस्कूल मधून त्या सहा वर्षाच्या काळात शिकून बाहेर पडलेली पिढी साने गुरुजींची कायमची ऋणी होऊन राहिली. साने गुरुजी संस्कृत, मराठी, इंग्रजी व इतिहास हे विषय शिकवत विद्यार्थ्यांच्या हृदयात वाट करून तयारी सह उतरलेला शिक्षकच तादात्म्य पावणे काय असते याचा अनुभव विद्यार्थ्यांनाच काय तर सहकारी शिक्षकांना सुद्धा देत असतो. साने गुरुजींच्या सहकारी शिक्षकांनी तसेच अनेक माजी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आठवणींच्या नोंदी जागो जागी करून ठेवल्याचे पुरावे आज हि पाहायला मिळतात. प्रताप हायस्कूल च्या छात्रालयाचे अधीक्षक म्हणून साने गुरुजींची कामगिरी म्हणजे समाज शील शिक्षकाने मुलांप्रती असलेल्या नात्याचे उत्तरदायित्व सांगणाऱ्या नोंदी नाही तर उपक्रम शील तेचा परिपाठ ठरावा इतक्या लक्षणीय व अनुकरणीय आहेत.

प्रताप हायस्कूल छात्रावासात साने गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेला दिनदर्शिकेचा उपक्रम त्यां काळी खूपच नाविन्यपूर्ण होता प्रताप हायस्कूल मधे जतन करून ठेवलेले दिनदर्शिकेचे हस्तलिखित अंक आजही ताजे टवटवीत वाटतात. शिक्षक हा वाटाड्या नाही तर सहप्रवासी झाला पाहिजे तरच मुलांमध्ये सहजीवन, स्वावलंबन, बंधुभाव व परस्पर सहकार्य या गुणांचे संवर्धन होते. हे साने गुरुजींनी आपल्या स्नेहमयी सोशिक वात्सल्यमय प्रेम भावाने सिद्ध केले आहे. ममता व करुणेच्या झऱ्या शिवाय सदगुणांचे बीजारोपण अशक्य आहे हा निसर्गाचा सहजभाव साने गुरुजी प्रत्यक्ष जगले.वसतिगृहाचे सर्व साधारण अनाथ पोरके उदास वातावरण साने गुरुजींनी कठोर शिस्तीने नाही तर आपल्या सहज कृतींनी व सहकार्याच्या भूमिकेने बदलून टाकले होते. छात्रालयात सेवा वृत्ती, स्वावलंबन, सहयोगी सद्भावाची भावना नंदू लागली. मुलांना अवमानित वा अपमानित करण्याऐवजी कठोर शब्दांच्या प्रहाराशिवाय कृतीचा एक एक मापदंड ठेवत साने गुरुजी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षक झाले.

सर्वांप्रति समभाव हा साने गुरुजींचा स्थायी स्वभाव होता. सेवा, श्रुश्रुषा व स्वच्छता या माणसाचा अहंभाव जाळणाऱ्या बाबींचा अंगीकार करीत साने गुरुजींनी आपल्या सहज वृत्तीने कृतीशील आचरणाने विद्यार्थ्यांना भावनिक धाग्यांनी बांधून एक परिवार निर्माण केला होता. आपले वयक्तिक दुखं व अडचणी बाजूला ठेऊन गुरुजी मुलांच्या सुख दुखात सहभागी होत आपल्या सहकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची आजार पणात सेवा श्रुशुषा केलीच त्याच्या अंत्यसमई खांदा देण्यासाठी साने गुरुजी सर्वात पुढे होते. आपण स्वतःच्या गरजा कमी करून आपल्या पगारातला मोठा हिस्सा साने गुरुजी आपल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर फी आजारपण इत्यादी अनुषंगिक बाबींवर खर्च करीत असत. एवढ्या उच्च कोटीची समभाव वृत्ती वेदना विरक्त झालेली साने गुरुजीं सारखी व्यक्तीच दाखवू शकते.

साने गुरुजी विद्यार्थ्यांना सामुदाईक सम पाळीवर आणण्याचा अनुभव देत असत. त्यामुळे त्यांच्या बद्दल विद्यार्थ्यांच्या मनात स्नेह भाव व विश्वासाचे नाते निर्माण झाले होते आपल्या चुकी बद्दल विद्यार्थ्यांसमोर उमदेपणाने व्यक्त होने हि सहज वृत्ती साने गुरुजींनी आयुष्यभर जोपासली होती. कोणत्याही शिक्षकाला अंतर्मुख करणारे लाभाविण प्रितीचे हे वर्तन नेहेमीच मार्गदर्शक ठरावे असेच आहे. गुरुजींमध्ये वसलेला कारुण्याचा प्रगाढ, सहानुभूतीचा दयाद्रतेचा व्यापक परिणाम इतरांवर निच्छितच झाल्या शिवाय राहिला नसणार.

साने गुरुजींनी मुलांना जीवनाचे यतार्थ दर्शन व्हावे सर्व प्रसंग व परिस्थितीचे भान यावे व जीवनाच्या भव्यतेचा अनुभव व्हावा. यासाठी सजगतेने प्रयत्न केले. शिक्षणातील उच्चतम आधुनिक तत्व व जीवन उपयोगी मूल्य रुजविण्याची छात्रालय हे प्रयोगभूमी बनले होये. छात्रालय दैनिक हे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निरागस मनोवृत्तीचा आरसा होते छात्रालय दैनिक हि कल्पनाच मुळी विद्यार्थ्यांचे सर्व स्पर्शी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी सामाजिक अनुभव देण्यासाठी व कृतीशील जबाबदेही नागरिक घडवण्यासाठी होते. शाळा व शिक्षण साने गुरुजींसाठी आत्यंतिक महत्वाचे होते. परुंतु देश, स्वातंत्र्य आंदोलन व स्वातंत्र्य हि मूल्य त्यांच्या साठी जीवनापेक्षा महत्वाची होती बंद दरवाजा आड चार भिंतीच्या आत चालणाऱ्या शिक्षणापेक्षा देश, देशातील राजकारण, समाजकारण या पासून शिक्षण बाजूला काढता येणार नाही. याच ठाम विचाराने देशसेवेसाठी गुरुजी क्षणाचाही विचार न करता शाळेतून बाहेर पडले. कदाचित हे वागणे आज विसंगत वाटेल परुंतु देश आणि समाजाचे मोल जेव्हा तोलले जाणार असते आणि अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो. तेव्हा शिक्षकाचे शिक्षणाचे व विद्यार्थ्यांची सामाजिक उत्तर दायित्वाच्या भूमिकेची सुसंगती साने गुरुजी प्रकार्षाने अधोरेखित करीत होते.

चांगला नागरिक हा जगाचा नागरिक होण्याची पात्रता अंगी बाळगून असतो पण त्याच्या जडण घडणीला आकार देण्याची प्रक्रिया परिपूर्ण करावयाची असेल तर माणसाच्या सार्वत्रिकतेचे व विश्वात्मकतेचे भान वृद्धिंगत करावे लागते खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याचा दरवाजा सताड उघडा करून देतो आज पर्यंत जगाने काय अनुभवले याची कल्पना देऊन वर्तमानात मानव जातीला कोणत्या आव्हानांना भिडायचे आहे याचे दिशा दर्शन घडवितो. अशा विशाल दृष्टीचे शिक्षण मुलांना बालपणीच मिळायला हवे असे साने गुरुजी सांगत

विद्यार्थ्यांना उद्दात ध्येयाचे दर्शन घडवितो तोच खरा आचार्य ज्ञान समर्पण हि फार मौल्यवान प्रक्रिया आहे त्यासाठी जीवनाचे दान द्यावे लागते साने गुरुजी तर जीवनदानी शिक्षक होते ज्ञानरचना वाद या संकल्पने पलीकडे त्याकाळच्या शिक्षणाची मांडणी साने गुरुजींनी चिंतन आणि अनुभूतींनी केली होती. मुलांवरील प्रेमामुळेच एवढ्या उत्कटपणे ते व्यक्त झाले आपले जीवन व्यापक प्रश्नांशी जोडणे म्हणजे शिक्षण हा ध्यास साने गुरुजींनी आपल्या जगण्याशी जोडला होता.

                                                                                      राजा अवसक

                                                                                     ९०२८२२१७१७


लोकशिक्षक साने गुरुजी

लोकशिक्षक साने गुरुजी तथागत गौतम बुद्धांना जगाचे शिक्षक म्हटले जाते. कारण आज पासून अडीच हजार वर्षांपूर्वी मानव कळपांमधून वसाहतीत समाज म्हण...